Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Wednesday, August 8, 2018

जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट

जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट



जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट

जागतिक आदिवासी दिवस हि संकल्पना नेमकी काय आहे? हे समजून घेतले तर आपणास हा दिवस साजरा करणे महत्वाचे वाटेल. अन्यथा वेळ येते आणि जाते तसाच हा दिवस सुद्धा जाईल. परंतु असे जर घडले तर मग तो एक आदिवासी म्हणून आपला पराभव असेल. आपण आज अनेक सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतो. कधीकाळी निसर्गपूजक असणारे आदिवासी आज गणपती उत्सवसुद्धा मोठ्या आपुलकीने आणि आपलेपणाने साजरा करतात. जर आपण मुलनिवासी या नात्याने विचार केला तर आपली संस्कृती आणि आपली अस्मिता, समाजाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आता खरच 'बस्स झाली दुनियादारी....चला जपूया आदिवासी संस्कृती सारी...!!!' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

जागतिक आदिवासी दिवस काय आहे ? हे जर एक आदिवासी म्हणून मला सांगता येत नसेल तर आपण इतरांना काय सांगणार...म्हणून आपण या दिवसाविषयी सखोल ज्ञान करून घेणे गरजेचे आहे.


दुस-या महायुद्धातील चटके सहन केल्यानंतर सगळीकडे जागतिक शांतता, सर्व देशांमध्ये पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, एकमेकांचे अधिकार व स्वातंत्र्य जपणे, गरिबी हटविणे, शिक्षण व आरोग्य या विषयांवर मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. या विचारांचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती करण्यात आली. आज संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिका, रुस, चीन, फ्रांस, इंग्लंड, भारत असे एकूण १९२ देश सदस्य आहेत. आपल्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले कि २१ व्या शतकात ज्याला आपण तंत्रज्ञानाचे युग, संगणकाचे युग असे म्हणतो..., त्या युगात जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगात आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे. या विळख्यातून त्याला बाहेर पडायला संधी मिळण्याची शक्यता अधिकच अस्पष्ट आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस "जागतिक आदिवासी दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासाभेतून सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात मग अमेरिका असो इतर आदिवासी समाज असलेले देश असोत त्यात भारताचाही सामावेस आहे...या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येवू लागला.


भारतातील आदिवासी समाजाच्या संर्वान्गीण विकासासाठी भारतीय संविधानात महत्वाच्या कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे.


सन १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही शासनव्यवस्था चालविण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली. २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू करण्यात आले. भारतीय संविधानात एकूण २२ भाग, १२ अनुसूची आणि ३९५ अनुच्छेद समाविष्ट करण्यात आले. यात सर्वात जास्त अनुच्छेद आदिवासी समाजासाठी आहेत. यात प्रामुख्याने आदिवासी समाजाच्या संरक्षणाचा विचार करण्यात आलेला आहे.

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन.



वेगळी तुझी बोलीभाषा, धर्म तुझा आगळा
लाकडाचा केला नांगर, अन स्वता बैल झाला
ओबड-धोबड जमीन कसत, मैलो मैल चालला
सर्वांआधी जन्मला तरी मागं कसा राहिला ?
होतास भोळा अंगात ना-ना कला
अफाट कल्पनाशक्तीने फुलवलास मळा
देवा तुझा हा हिरवा निसर्ग तू जन्मापासून पुजला
सर्वांआधी जन्मला तरी मागं कसा राहिला ?
इतिहास रचला गेला, लिहिला गेला
पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला
गड जिंकले गेले, तुझा इतिहास मात्र गाडला
सर्वांआधी जन्मला तरी मागं कसा राहिला ?

आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर  डोंगर दर्‍यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्‍याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्‍या रानमेवाव्यावर करीत आहे. आजही गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, किनवट, आदिलाबाद (आंप्र.) या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले.  भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात. आदिवासी हे हिंदू नाहीत, असा निर्णय न्यायालयाने एका प्रकरणात १९ जानेवारी १९७९ रोजी दिला आहे. आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते होऊन गेले  क्रांतिकारक बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे , बख्त बुलंद शहा, दलपतशहा, रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा, या प्रत्येकाची शासनाने, पाठय़पुस्तक मंडळाने दखल घेतली पहिजे.
एकलव्याच्या कालापासून आदिवासी समाज अन्याय सहन करत आला आहे. अगदी इतिहासकारांनी देखील अन्याय करण्याचे सोडले नाही. इतिहासाच्या बाबतीत आदिवासी समाजावर झालेला अन्याय माझ्या कवितेतून उलगडण्याचा प्रयत्न केला...
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?
जंगलात बहरलेला संसार
सोडूनी केला समाजाचा उध्दार
ते आदिम संस्कृतीसाठी जगले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?
आजचा इतिहासही रडेल
जेव्हा आदिवासी बलिदान बोलेल
ते मानवतेसाठी फासावर चढले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?

रावणाचे वंशज आजही आदिवासी म्हणूनच श्रीलंकेत ओळखले जातात अन त्यांना श्रीलंका शासनाकडून तशी वंशज म्हणून रक्कम अदा केली जाते .

आदिवासी मुलांनी आपल्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी व आकाशात उंच भरारी घ्यावी म्हणून एक कविता त्यांना ऐकवली...
आदिवासी बांधवा
उठ!
घे मोकळा श्वास
पसरव तुझे बाहू
आणि
लुट तू
जीवनाची सारी संपत्ती
पण उठ
आदिवासी बांधवा
उठ!
कुडाची झोपडी सोड
जंगलातून बाहेर बघ
आत्ता वेळ आलीय
ओळख
बहुमोल हि वेळ
अरे तू म्हणशील
तसाच होवू शकेल
तुझ्या जन्माचा प्रवास
पण तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!
होवू दे रे जाण
कसा सोकावलाय काळ
तू आहेस रे विजेता
पण तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!
आत्ता एक लक्षात ठेव
सुंदर तुझे स्वच्छंदी जीवन
अडचण वाटतेय
जंगलाच्या ठेकेदारांना
म्हणून तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!
निसर्गातील पक्षांगत
घे भरारी
पण विकास करील कोणी
दुख सारील कोणी
यावर विश्वास ठेवू नकोस
तू आहेस निर्मळ  झरा
पण तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!
सुंदर
संपन्न
संस्कृतीसवे
तू उठ
आदिवासी बांधवा
उठ!

अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिवस ख-या अर्थाने कुठे तरी आदिवासी विचारांनी साजरा करू शकलो या समाधानाने हे सर्व इथे मांडत आहे. हा सर्व सोपस्कार इथे मांडण्यापाठीमागे एकच उद्दिष्ट कि असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात सादर झाले पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे.

जय आदिवासी
आपणा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

1 comment:

  1. Great salute to शंकर भालेराव Sir. Thanks for this Blog.
    Bihar

    ReplyDelete

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24 इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Do...